बाळंतपणात तूप,नको ग बाई !

 बाळंतपणात तूप,नको ग बाई !

बाळंतपणात तूप नको ग बाई ! हे वाक्य आजकाल घराघरात ऐकू येत आहे . सध्याच्या काळात सर्वसाधारणपणे  अगदी बारीक सडपातळ अंगकाठी म्हणजे 'फिट ' ही  संकल्पना जनमानसात रूढ झाली आहे. त्याच बरोबर जीन्स , टॉप हा पेहराव केला म्हणजे मॉडर्न ही  दुसरी एक संकल्पना समाजामध्ये प्रचलित झाली आहे त्यामुळे सर्वसाधारणपणे मुली,महिला स्लिम राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसून येतात. ही गोष्ट जरी चांगली असली तरी सर्वच स्लिम लोक फिट असतातच असे नाही. त्याच बरोबर आपल्याला असेही दिसून येते की बऱ्याचदा स्लिम राहण्याच्या नादात काही आवश्यक घटकांची कमतरता निर्माण झालेली दिसून येते 

तर मुख्य मुद्दा असा आहे की  बाळंतपणात तूप नको हे म्हणणे कितपत योग्य आहे. त्याची दुसरी बाजू अशी की बाळंतपणात तूप खाल्ले तर वजन वाढते असा एक समज प्रचलित झाला आहे. या दोनही  मुद्यांचा विचार केला तर आपण आधी पहिला मुद्दा विचारात घेऊ 

बाळंतपणात तूप खावे कि खाऊ नये 

या प्रश्नाचे उत्तर असे आहे की  बाळंतपणात स्तनदा मातेने तूप खाणे अतिशय आवश्यक आहे. गरोदरपणात  बाळ हे आईच्या शरीरातील पोषण मूल्ये घेऊन वाढत असते त्यामुळे आईने जरी जास्तीची स्वतःची देखभाल केली नाही तरी बाळ त्याचे काम करतच असते त्यावेळी ते पूर्णपणे आईच्या शरीरावर अवलंबून असते. त्यामुळे आईच्या शरीराची बऱ्यापैकी झीज होते त्यामुळेच  भारतीय स्त्रियांना बाळंतपणात चांगला खुराक दिला जातो जसे डिंकाचे लाडू , मेथीचे लाडू , अळिवाचे लाडू. खारीक खोबरे बदाम,गोडंबी, असा विविध प्रकारचं सुका मेवा त्या लाडू मध्ये असतो . जर आपण नीट बारकाईने पाहिले तर आपल्या लक्षात येईल की  यातील बरेच घटक हे उष्ण  गुणधर्म असलेले असतात त्यामुळे याच्या सोबत जर देशी गायीचे शुद्ध तूप घेतले तर त्याचे उष्ण गुणधर्म कमी होतात आणि ते बाधत नाहीत. जर ते पदार्थ आईला बाधले तर बाळाच्या आरोग्यावर पण त्याचा विपरीत परिणाम होतो 

दुसरा महत्वाचा मुद्दा असा की  की बाळंतपणाच्या काळात स्त्रिया ह्या जास्त काळ घरातच असतात त्यामुळे सूर्याच्या उन्हामधून मिळणारे 'डी'  जीवनसत्व त्यांना मिळत नाही. स्तनदा माता बाळाला दूध पाजत असतात त्यामुळे त्यांच्या शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी उत्तम आहार, पोषण मूल्यांची गरज असते त्यासाठी नैसर्गिकरित्या कॅल्शियम, डी जीवनसत्व गायीच्या दुधा पासून, तुपापासून मिळत असते. देशी गाय  ही नेहमी रानात  चरते  त्यामुळे सूर्यप्रकाशापासून मिळणारे 'डी'  जीवनसत्व शरीरात शोषून घेते. हे 'डी' जीवनसत्व आपोआपच  दुधा पासून, तुपामधून मातेला आणि तिच्या बाळाला मिळतात.  

दुसरे असे की बाळंतपणानंतर बऱ्याचदा स्त्रियांच्या शरीरामध्ये वात पित्त कफ यांचे असंतुलन  होऊन कंबर दुखणे, पाय दुखणे, खांदे दुखणे अशा तक्रारी दिसून येतात.परंतु आहारामध्ये तुपाचा समावेश केल्यास वात पित्त कफ याचे संतुलन होण्यास मदत होते 

बाळंतिणीने जर नियमित दोन चमचे तूप जेवणा सोबत घेतल्यास पोट साफ राहते आणि वाताचे संतुलन होते. आईचे पोट जर ठीक नसेल तर बाळाचे पण पोट कुरकुरायला लागते. त्यामुळे परंपरागत पद्धतीने बनवलेले देशी गायीचे तूप  बाळाच्या आईनेच नियमित घेतले पाहिजे 

 नऊ महिने  भार पेलल्या मुले शरीर कुरकुरत असते. तुपा मुळे  शरीरातील विविध सांध्यांना वंगण  मिळते. शरीराची झालेली झीज भरून येण्यासाठी आहारामध्ये तुपाचा समावेश आपल्या पूर्वजांनी अगदी जाणीवपूर्वक केला आहे  

तूपामुळे  वजन वाढते हे खरे आहे का ? 
 

आपणाला वजन वाढण्याची भीती वाटत असेल तर आपण कोणते तूप खातो हे पण कटाक्षाने पाहणे गरजेचे आहे. देशी गायीच्या दुधाला दही लावून घुसळून लोणी काढून त्यापासून तूप केलेले असेल तर ते तुमचे वजन कदापि वाढवणार नाही. ज्याप्रमाणे सोन्याला शुद्ध होण्यासाठी पुन्हा पुन्हा अग्नी परीक्षा द्यावी लागते त्याच प्रमाणे तुपाला शुद्ध होण्यासाठी  दूध -दही-लोणी- तूप असा प्रवास करावा लागतो. बऱ्याच घरातून सायीपासून तूप केले जाते  व तेच घरचे साजूक तूप सर्वोत्कृष्ट असते असा समज जनमानसामध्ये आहे. परंतु दुधाचे दही लावून पारंपरिक पद्धतीने घुसळून लोणी काढून जर तूप केले तर ते खरे तूप यासाठी दूध मात्र देशी गायीचेच हवे . या तुपामुळे तुमचे कदापि वजन वाढणार नाही.असे तूप तुम्ही देशी गायीच्या दुधाला दही लावून (सायीला नाही ) घरी बनवू शकता किंवा एखाद्या देशी गाय पालन करणाऱ्या शेतकऱ्याकडून प्रत्यक्ष खातरजमा करून घेऊ शकता. शकयतो असे तूप मध्यस्थामार्फत घेणे टाळावे   

असे असले तरी बाळंतपणात  थोडे वजन वाढले तरी जस जसे बाळ दूध पिते तस तसे वजन कमी होऊ लागते त्यामुळे वजनाचा फार विचार करून बाळंतपणात पौष्टिक खाणे टाळू नये. अन्यथा बाळंतपणानंतर केस गळणे , त्वचा कोरडी पडणे , कंबर दुखणे , सांधे दुखणे अशा तक्रारी दिसून येतात 

प्रा डॉ सुचेता दळवी 

Comments

Popular posts from this blog

कामधेनू