कामधेनू



 

कामधेनू 

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गायीला अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या जन्मापासून ते अगदी शेवटा पर्यंत गाय आपली साथ देते. मूल जन्माला आले कि ते आईचे दूध तर पितेच पण गायीचे दूध पण पिते आणि अगदी शेवटच्या समयी अंत्यसंस्कारासाठी  गायीच्या शेणाच्या गोवऱ्याच वापरल्या जातात . अगदी लहानपणी आपल्याला सांगितले जाते की गायीच्या ठायी तेहतीस कोटी देवांचा वास आहे. आपल्या देव देवतांचे फोटो पहिले तरी आपल्याला त्यामध्ये गाय दिसते त्यामुळे हिंदू संस्कृती मध्ये गाय ही नेहमीच पूजनीय मानली गेली आहे. 

मित्रांनो  मला आपल्या पूर्वजांचे नेहमीच फार कौतुक वाटते, तुम्ही जर बारकाईने या गोष्टीचा अभ्यास केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे, आपल्या पूर्वजांना ज्या ज्या गोष्टी मनुष्य जाती साठी खूप हिताच्या आहेत आणि त्या नष्ट होऊ नये असे वाटत होते त्याला त्यांनी देवत्व बहाल केले.  मित्रांनो देव म्हणजे तरी काय? देवाकडे आपण नेहमी जातो तेव्हा काय म्हणतो ते आपण पाहूया - देवा सर्वाना सुखी ठेव, सर्वांचे आरोग्य चांगले राहूदे , मला धन ,धान्य , आरोग्य संपन्न कर. आता मला सांगा तुम्ही हे जे सगळे मागत आहात ते आपल्या दारातील देशी गाय तुम्हाला देणार आहे. कसे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. मग तिला देव मानायला काय हरकत आहे उलट आपण ज्या देवाच्या मूर्ती समोर साकडे घालतो ती निर्जीव असते आणि ती आपल्या मनोकामना पूर्ण करेल कि नाही माहित नाही पण आपल्या घरी जर देशी वंशाची गाय असेल तर ती आपल्या या सगळ्या मनोकामना नक्की पूर्ण करेल, कारण ती काय दगडाची मूर्ती नाही. हे सगळे वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल किती महान आहे आपली संस्कृती ज्या संस्कृतीने नद्या ,समुद्र, पर्वत , वृक्ष ,वेली, पशू ,पक्षी  यांची पूजा करायला शिकवले. हळूहळू आपल्याला या साऱ्याचा विसर पडू लागला आणि मग ग्लोबल वॉर्मिग सारखे परिणाम दिसू लागले , घराघरात कॅन्सर पीडित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली, आणि आता कोरोना सारख्या महामारीने सगळ्या जगात हाहाकार माजवला आहे आणि मग 'रोगप्रतिकारक शक्ती ' हा शब्द म्हणजे जणू आरोग्याचा मंत्रच झाला. आणि मग अनेक जण पुढे आले, जाहिरातीचा भडीमार सुरु झाला , प्रत्येक जण आपापल्या परीने सांगू लागला की  रोगप्रतिकारक शक्ती कशी  वाढवायची ते. मला सांगा मित्रांनो  रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची जादूची छडी जर माणसाकडे असती तर तो आजारीच नसता पडला . ती अशी घटकेत मिळणारी गोष्ट नाही म्हणून तर आपल्या पूर्वजांनी त्याची सोय प्रत्येक घरा घरात करून ठेवली होती गायीच्या रूपात. म्हणून तर तिला कामधेनू म्हटले जाते.

आपल्याला  भरभरून धन ,धान्य आरोग्य प्रदान करणारी धेनू  म्हणजे आपली देशी गाय हीच आहे आपली कामधेनू आणि आपले खरे दैवत  म्हणून तिची पूजा करण्यात आपल्याला काहीही गैर वाटण्याचे काहीच कारण नाही. दुध, दही, ताक, लोणी, तुप अशा अनेक आरोग्यदायी गोष्टी आपल्याला देऊन गाय आपले, आपल्या मुलाबाळांचे, आरोग्य तर सांभाळतेच परंतु शेण, गोमुत्र, शेणखत, गांडुळखत, देऊन आपल्या शेतीचेही आरोग्य सांभाळते. त्याशिवाय गोवऱ्या, गोबरगॅस इत्यादी च्या वापरामुळे पर्यावरण रक्षणाचेही कार्य करते. गोवऱ्यांच्या वापरामुळे झाडांची होणारी तोड थांबवते. याशिवाय वृक्षतोडीमुळे होणारे ग्लोबल वार्मिंग सारखे धोके कमी करते. ज्या ज्या वेळी वृक्षतोड होईल त्या त्या वेळी अनेक प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास होत जातो. परंतु जर जिथे जिथे शक्य आहे तिथे गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांचा वापर पर्यायी इंधन म्हणून केल्यास वृक्षतोडीला आपोआपच आळा बसेल. आपल्या पुर्वजांना या सगळ्याची पुरेपुर जाणीव होती आणि म्हणूनच त्यांनी गायीला कामधेनू ची उपाधी दिली . चला तर मग आजपासून आपणही आपली भारतीय वंशाची देशी गाय कशी वाचेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूया.


 प्रा डॉ सुचेता दळवी 

Comments

Popular posts from this blog

बाळंतपणात तूप,नको ग बाई !